नागोठणे रेल्वे स्थानक सल्लागार

समितीवर निखिल मढवी यांची निवड

| नागोठणे | वार्ताहर |

मध्य रेल्वेचे अत्यंत महत्वाचे व मध्यवर्ती स्थानक असलेल्या नागोठणे स्थानकाच्या सल्लागार समितीवर नागोठण्याजवळील निडी गावातील रहिवासी आणि कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य निखिल बाळाराम मढवी यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र निखिल मढवी यांना नुकतेच मध्य रेल्वेच्या छ. शिवाजी महाराज टर्मिनल येथील मंडळ कार्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापक जितेंद्र यादव यांच्याकडून देण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील नागोठणे रेल्वे स्थानकाच्या कन्सल्टेटिव्ह कमिटीवर सदस्य म्हणून निखिल मढवी यांची केलेली ही निवड 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2024 या एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. नागोठणे स्थानकात प्रवाशांना भेडसावणा-या समस्या जाणून घेणे व त्यावर उपाययोजना करणे, सार्वजनिक हिताचा व सार्वजनिक सोयींचा कोणताही विषय, प्रवाशांना सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध बाबतीत ही कमिटी कार्य करित असते. अशा या महत्वपूर्ण कमिटीवर सामाजिक कार्यकर्ते निखिल मढवी यांची निवड झाल्याने नागोठणे स्थानकातील समस्या सोडविण्यास नक्कीच मदत होणार असल्याने त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Exit mobile version