नागोठण्याची लेक ठरली ‌‘मिसेस महाराष्ट्र’

रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा; मानसी वाळंज-मोकल यांची मानाच्या मुकुटावर मोहोर

| नागोठणे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील नागोठण्याच्या मानसी वाळंज-मोकल यांनी राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत ‌‘मिसेस महाराष्ट्र 2026′ हा मानाचा किताब पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे नागोठणे गावासह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्मृती एंटरप्रायझेस प्रस्तुत “The Jewel One Pageant – Mrs Maharashtra 2026” या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेचा भव्य ग्रँड फिनाले नुकताच पुणे येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सहा प्रमुख शहरांमध्ये प्राथमिक फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. राज्यभरातून 500 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून कठोर निवड प्रक्रियेनंतर अवघ्या 50 स्पर्धकांना अंतिम फेरीत स्थान मिळाले.

ग्रँड फिनालेमध्ये आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व, प्रभावी संवादकौशल्य, रंगमंचावरील वावर आणि आकर्षक सादरीकरणाच्या जोरावर मानसी वाळंज-मोकल यांनी परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला आणि ‌‘मिसेस महाराष्ट्र 2026′ या प्रतिष्ठेच्या किताबावर आपले नाव कोरले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात मानसी यांच्या विजेतेपदाची घोषणा होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.

मानसी वाळंज-मोकल यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचाच नव्हे, तर नागोठणे आणि रायगड जिल्ह्याचाही गौरव वाढला आहे. मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर राज्याचा मानाचा मुकुट आपल्या नावावर करणाऱ्या मानसी आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version