नागोठण्यात बर्निंग कारचा थरार; पाच प्रवाशी थोडक्यात बचावले 

| नागोठणे | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका कायम सुरू असतांनाच नागोठण्याजवळील वाकण नाका येथे बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. कारमधील चार प्रवाशी नाष्ता करण्यासाठी हाॅटेलमध्ये गेले असता, कारला अचानक आग लागली. कारमध्ये बसलेल्या एका मुलीला बाहेर  काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात बुधवारी (दि.15) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडला. ही आग नक्की कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही. 

सायन मुंबई येथील खरात कुटुंबीय आपल्या डिझायर कार मधून खोपोली, पाली मार्गे गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी चालले होते. कारमध्ये किशोर खरात, कांचन किशोर खरात, साक्षी खरात (23), गार्गी खरात (16) व कारचालक दत्तात्रेय पवार असे पाच जण होते. खरात कुटुंबीय वाकण नाका येथे नाष्ता करण्यासाठी थांबले होते. त्यांनी आपली कार वाहतुकीसाठी बंद असलेल्या वाकण  येथील जुन्या पुलाच्या रस्त्यावर उभी केली होती. मात्र यावेळी साक्षी खरात ही कारमध्येच होती. याचवेळी कारचे इंजिन असलेल्या समोरील बाजूला आग लागल्याचे कार शेजारीच सुतारकाम करणा-या महिलेच्या लक्षात येताच त्यांनी कारमधील साक्षी हिला बाहेर येण्यास सांगितले. थोड्याच वेळात संपूर्ण कारने पेट घेतला. यावेळी कारमधील चारजण हाॅटेलमध्ये नाष्ता करीत असल्याने व साक्षीला कारमधून तात्काळ बाहेर काढण्यात आल्याने, पुढील अनर्थ टळला. आग विझविण्यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या वाकण पोलिस मदत केंद्रातील सहाय्यक पो.उपनिरिक्षक एस.एस. खेडेकर व हे.काॅ. अमोल नलावडे यांनी तात्काळ आमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेम कंपनीच्या अग्निशामक दलाला बोलविले. त्यानंतर थोड्याच वेळात कारला लागलेली आग विझविण्यात आली. 

वाकण मदत केंद्राचे एस.एस. खेडेकर व अमोल नलावडे यांनी यावेळी वाहतूकीत कोणताही अडथळा येऊ दिला नाही. या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली. असून अपघाताचा पुढीलतपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि. हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काॅ. गणेश भोईर करीत आहेत. 

Exit mobile version