| खरोशी | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील दिव गावाचे सुपुत्र, देशासाठी निःस्वार्थ भावनेने तब्बल 24 वर्षे सेवा बजावणारे ऑपरेशन ‘सिंदूर’चे रियल हिरो, ऑर्डिनरी नायब सुभेदार नितीन रामचंद्र ठाकूर हे भारतीय सैन्य दलाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे शौर्य, निष्ठा आणि कर्तव्य परायणतेमुळे त्यांनी समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ठाकूर यांनी आपल्या सेवाकाळात अनेक कठीण आणि धोकादायक मोहिमांमध्ये सहभाग घेत देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान दिले.
विशेषतः ऑपरेशन ‘सिंदूर’मधील त्यांच्या धाडसी कामगिरीमुळे त्यांना रियल हिरो म्हणून ओळख मिळाली. सीमारेषेवर कर्तव्य बजावताना त्यांनी अनेक आव्हानांना सामोरे जात देशसेवेचा आदर्श घालून दिला. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संपूर्ण वाशी खारेपाट विभागातर्फे गावकऱ्यांकडून, सहकारी जवानांकडून आणि कुटुंबीयांकडून भावनिक वातावरणात त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. यानिमित्ताने शिवतेज युवा फाऊंडेशन रायगड संस्थेचे वतीने वाशी जगदंबा माता मंदिर येथे भव्य स्वागत करून माजी सैनिक संघटनेच्या वतीने मिरवणुकीने वाजत गाजत सन्मानाने वाशी-वढाव-दिव असा प्रवास करत असताना ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. त्यांच्या दिव येथे सत्कार समारंभ (दि.28) मार्च रोजी झाला. यावेळी वाशी लढावं दिवस येथील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वीर जवानाला भव्य मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश थवई यांनी केले.
तुमची देशसेवा आमच्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. ऑर्डिनरी नायब सुभेदार नितीन ठाकूर यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक तरुणासाठी मार्गदर्शक आणि पुढील आयुष्यासाठी दिशा देणारा ठरेल.
हेमंत पाटील
अध्यक्ष शिवतेज युवा फाऊंडेशन रायगड







