| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नैना प्रकल्पाविरोधात स्थानिक भूमीपुत्रांचे सलग सहाव्या दिवशी बेमुदत उपोषण सुरु आहे. कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी सोमवारी मुंबई-गोवा महामार्ग रोखला होता. त्यामुळे काही कालावधीसाठी वाहतुक कोंडी झाली. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते.
रायगड जिल्ह्यातील नैना प्रकल्प रद्द करून “एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली” लागू करावी, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली घरे नियमीत करावीत, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा नैना प्रकल्प पुर्णपणे रद्द करावा, अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.
ॲड. सुरेश ठाकूर, अनिल ढवळे, जयराम कडू, मधुकर पाटील, समीर पारधी, रवींद्र गायकर, मोहन गवंडी, बबन फडके, दमयंती भगत, शामिनी ठाणगे, निलेशा भगत, सविता घरत, यांच्यासह ग्रामस्थ उपोषणात सहभागी आहेत. सिडको व राज्य सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्या ज्योती चोरघे या आज आत्मदहन करणार होत्या. परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना हा निर्णय माघार घेण्याची विनंती केल्याने त्यांनी आत्मदहन केले नाही. शासनाने दखल न घेतल्यास पुन्हा आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी दिला.
जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देण्यात आल्या. नैना प्रकल्पाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलकांनी केला. या निमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात लावण्यात आला होता. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली.