| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाचे उड्डाण आता हाती येण्याच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे विमानतळ प्रभावित क्षेत्रातील नैना प्रकल्पाला गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेलमधील 23 गावांच्या 37 चौरस किमी क्षेत्रात तब्बल 12 नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून 12 टाउनशिप उभारल्या जाणार आहेत. या टाऊनशिपसाठी पायाभूत सुविधा उभारणीसाठी तब्बल 6,500 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून, अनेक कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत.
सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल यांनी नुकताच टीपी स्कीम 11 मधील रस्त्यांच्या सीमांकन कामांचा आढावा घेतला. नैना क्षेत्रासाठी पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजनही करण्यात आले आहे. उल्हास नदीवरील रखडलेले कोंढाणा धरण सिडकोने ताब्यात घेतले असून, या प्रकल्पामुळे नैना क्षेत्रातील तहान भागणार आहे. तथापि, लॅण्ड पुलिंग मॉडेलमुळे मूळ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या केवळ 40 टक्के क्षेत्रफळाचे विकसित भूखंड परत मिळणार असल्याने काही शेतकरी या योजनेला विरोध करत आहेत. तरीदेखील या प्रकल्पामुळे परिसराचा आर्थिक व सामाजिक विकास होणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे आणि शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.







