कारवाई अर्धवट सोडून नैनाचे पथक माघारी

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

सुकापूर-मालेवाडी येथील एका इमारतीवर 23 ऑगस्ट रोजी अर्धवट कारवाई करण्यात आली. या इमारतीचे केवळ पाच ते सहा कॉलम तोडून नैनाचे अतिक्रमण विरोधी पथक माघारी गेले. त्यामुळे या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

23 गावांमध्ये नैना येऊ घातलेली आहे. या नैनाला शेतकर्‍यांचा प्रचंड विरोध आहे. असे असतानादेखील अनेक ठिकाणी कोणत्याही परवानगी न घेता इमारती उभ्या राहात आहेत. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. सामान्य नागरिक आपल्या आयुष्याची जमापुंजी या इमारतीचा रूम घेण्यात घालवत आहेत. इमारतीवर कारवाई झाल्यानंतर त्यांची आयुष्याची जमापुंजी गेल्यामुळे त्यांच्यावर रडण्याची वेळ येते. तालुक्यातील सुकापूर, विचुंबे, उसर्ली खुर्द, देवद अशा अनेक गावांमध्ये विनापरवानगी इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. 23 ऑगस्ट रोजी नैनाचे पथक सुकापूर-मालेवाडी येथील लक्ष्मी पब्लिक स्कूलच्या समोर असणार्‍या इमारतीवर कारवाई करण्यासाठी आले होते. यावेळी ही इमारत जमीनदोस्त करण्याऐवजी पहिल्या मजल्यावरील केवळ पाच ते सहा कॉलम पाडण्यात आले. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्याचे काम सुरू आहे. नैनाकडून पूर्ण कारवाई करण्यात आली नाही. कारवाईचा केवळ दिखावा करण्यात आला. जून महिन्यात विचुंबे येथेदेखील अर्धवट कारवाई करण्यात आली होती. तर, एप्रिल महिन्यात सुकापूर येथील मौर्या नामक बांधकाम व्यावसायिक बांधत असलेल्या 4 ते 5 माळ्याची स्वप्नपूर्ती सोसायटी या इमारतीवरदेखील कारवाई न करता अतिक्रमण विभाग माघारी गेले होते. याप्रकरणी केवळ अदखल पत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अर्धवट कारवाईबाबत नैना अधिकार्‍यांवर संशय व्यक्त केला जात आहे.

कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये फ्लॅट घेऊ नका, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
Exit mobile version