शिवडी-न्हावा सागरी सेतूला बॅ.अंतुलेंंचे नाव द्या

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची मागणी
। उरण । वार्ताहर ।
कोकणचे भाग्यविधाते म्हणून समजले जाणारे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीयमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांचे नाव नव्याने उभे रहात असलेल्या न्हावा शिवडी पुलाला देण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
रायगड जिल्ह्यात अनेक मोठमोठे प्रकल्प आणून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीचे म्हणजे रायगड जिल्हा असे केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री असताना अनेक धाडसी निर्णय घेऊन रायगडचा कॅलिफोर्निया बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु अल्पावधीतच त्यांना पदावरून जावे लागल्याने ते स्वप्न अधुरे राहिले आहेत. तसेच केंद्रीयमंत्री असतानाही जिल्ह्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. त्याचा फायदा जिल्ह्याबरोबर देशातील जनतेलाही होत आहे. असे जनमानसांचे नेतृत्व असलेल्या बॅ. ए. आर. अंतुले यांचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी त्यांचे नाव न्हावा शिवडी पुलाला देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे जेष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही याचे समर्थन करीत या मागणीचा विचार व्हावा असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या या मागणीचे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून स्वागत होत आहे. त्याचबरोबर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version