साकव संस्थेच्या वतीने सभागृहाचा नामकरण सोहळा

पेण | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील साकव संस्थेच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पेण तालुक्यातील पाबळ खोर्‍यातील संस्थेच्या सभागृहाचे कै. नवीनभाई सोष्टे सभागृहाचा नामकरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास सोष्टे यांच्या पत्नी किशोरी सोष्टे उपस्थित होत्या. सोष्टे यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन सोष्टे यांनी पत्रकारिता व लिखाणाच्या 50 वर्षांहून अधिक कारकीर्दीत आपल्या स्वयंसिद्ध लेखणीने भूमीपुत्र, आदिवासी, शेतकरी, महिला, मच्छिमार व बेरोजगारांच्या समस्यांवर आवाज उठविला आहे. प्रदूषण, पर्यावरण, समाजकारण इत्यादी विषयांवर व्यापक लिखाण केले आहे.
या सोहळ्यात साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर, निवृत्त कर्नल एम.डी. शिवकर, मंजुळा पाटील, नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे, ज्येष्ठ पत्रकार कवी बंधू जगदीश आदींनी सोष्टे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला व साकव संस्थेसोबत सोष्टे यांचे नाते किती दृढ होते हे उपस्थितांना सांगितले. या कार्यक्रमास साकव संस्थेच्या माध्यमातून सोष्टे यांच्याशी ऋणानुबंध निर्माण झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते, सोष्टे यांचा मित्रपरिवार, हितचिंतक व कुटुंबीय उपस्थित होते.

Exit mobile version