नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा

मुरुडमध्ये भव्य स्मारक उभारण्याची मागणी; पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचे आवाहन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वासह सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुरुड येथे आयोजित शोकसभेत खा. सुनील तटकरे भावूक झाले. नाना पाटेकर यांच्या अभिनय, राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेतील योगदानाचा गौरव करताना, केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, तसेच मुरुडमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी त्यांनी केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी नाना पाटेकर यांना पुष्प गुलाब अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. चित्रकार महेंद्र पाटील यांनी स्वतः रेखाटलेले नाना पाटेकर यांचे चित्र त्यांचे जिवलग मित्र खा. सुनील तटकरे यांना भेट दिले.

अभिनयासोबत माणुसकीचा वारसा मनोगत व्यक्त करताना तटकरे म्हणाले की, नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर अभिनय, स्पष्टवक्तेपणा, राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यांचा अनोखा संगम असलेले बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. नानांशी असलेल्या मैत्रीच्या आठवणी सांगताना तटकरे भावूक झाले. पाहुण्यांचे स्वतः स्वागत करणे, जेवण वाढणे आणि दरवर्षी गणपतीची सजावट स्वतः करणे, अशा साध्या कृतींतून त्यांच्यातील जिव्हाळा आणि संवेदनशीलता दिसून येत असे, असे त्यांनी सांगितले. नाम फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे तटकरे म्हणाले. प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणे, हीच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची खरी ओळख होती.

नानांच्या जीवनप्रवासाची माहिती भावी पिढ्यांना मिळावी आणि तरुणांना प्रेरणा मिळावी, यासाठी मुरुडमध्ये भव्य स्मारक उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या नाना पाटेकर यांना पद्मभूषण मिळावे, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. नानांचे विचार आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या शोकसभेला नगराध्यक्षा आराधना दांडेकर, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, मनोहर बैले, श्रीकांत सुर्वे, मनोज भगत, वासंती उमरोटकर, संजय गुंजाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि नानांचे जिवलग मित्र उपस्थित होते.

रंगभूमीवर अभिनयाचा ठसा
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. कारगिल युद्धाच्या काळात मराठा रेजिमेंटमध्ये सेवा बजावण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या नानांच्या देशप्रेमाचाही त्यांनी उल्लेख केला.
Exit mobile version