पटोलेंच्या ‘एकला चलो रे’ वर आघाडीत अस्वस्थता

। मुंबई । वृत्तसंस्था ।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेस नेत्यांकडे खासगीत नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीत अस्वस्थता असल्याचे संकेत मिळत आहेत.

पटोले यांनी राज्यात स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांपासून ते सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंतच्या सर्वच नेत्यांनी पटोले यांच्या सुरात सूर मिसळला होता. निवडणुकीला अडीच वर्षे बाकी असताना पटोले यांनी ही भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगीत नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला अस्थिर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, अशी धारणा शिवसेनेची झाली आहे. शिवाय राष्ट्रवादीनेही अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे अनेक नेते स्वबळावर लढण्याच्या या मताचे आहेत.अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तर तशी जाहीर प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. त्यामुळे पटोले वारंवार स्वबळावर लढणार असल्याचं सांगत आहे. परिणामी शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसची ही भाषा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्नच असल्याची भावना शिवसेनेमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पटोलेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. त्याआधीही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी स्वबळाची भाषा केल्यास लोक जोड्याने हाणतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. तर, निवडणुका अजून लांब आहेत. त्यामुळे पटोले यांनी आताच विधान करून वातावरण क्लुषित करू नये, असं अजित पवारांचं मत असल्याचं बोललं जात आहे.

Exit mobile version