नांदगाव केंद्राचे ‘आरोग्य’ धोक्यात

वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा मिळण्याची मागणी होत असताना मागील महिन्यापासून याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने पंचक्रोशीतील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी यात तातडीने लक्ष घालून प्रश्‍न मार्गी लावावेत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

नांदगाव येथील आरोग्य सेवेत असलेल्या प्राथमिक आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळावा यासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर व उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष वाणी यांना मागील महिन्यात एक निवेदन सादर करण्यात येऊन मागणी करण्यात आली होती.

याबाबत तालुका उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात प्राथमिक आरोग्य पथक नांदगांव हे पंचक्रोशीतील एकमेव आरोग्य पथक असून सध्या हे विविध समस्यांचे आजार बनले आहे. या पथकामध्ये आजूबाजूच्या गावातील रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येत असून, सध्या त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथे निवासी वैद्यकीय अधिकारी यांची कमतरता असल्याने रात्री अपरात्री नांदगाव मजगांव पंचक्रोशीतील रुग्णांना मुरुड अलिबाग जावे लागत आहे. तसेच याठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्ण सेवेमध्ये वारंवार अडचणी निर्माण होत आहेत.

निवेदन देऊनही अद्याप या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने पंचक्रोशीतील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, याविरोधात वेळप्रसंगी जनआंदोलन केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष घालून येथील आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून जनतेचा दुवा घ्यावा, अशी भावना व्यक्त होत आहे.

Exit mobile version