। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आरोग्य सेवेत असलेल्या प्राथमिक आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळावा यासाठी महेंद्र चौलकर व स्वप्नील चव्हाण यांनी आपल्या सहकार्यांसमवेत तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष वाणी यांना एक निवेदन सादर करण्यात येऊन मागणी करण्यात आली.
पंचक्रोशीतील हे एकमेव आरोग्य पथक असून सध्या ते विविध समस्यांचे आजार बनले आहे. या पथकामध्ये आजूबाजूच्या गावातील रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येत असून सध्या त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथे निवासी वैद्यकीय अधिकारी यांची कमतरता असल्याने रात्री अपरात्री नांदगाव-मजगांव पंचक्रोशीतील रुग्णांना मुरुड किंवा अलिबाग जावे लागत आहे. तसेच याठिकाणी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्ण सेवेमध्ये वारंवार अडचणी निर्माण होतात. गर्भवती स्त्रियांना देखील वेळेवर उपचार उपलब्ध होत नसल्याने त्यांना पुढील उपचारास अलिबाग- मुंबई येथे जावे लागत आहे म्हणून येथील प्राथमिक आरोग्य पथकाचे रूपांतर प्राथमिक आरोग्य केंद्रात करून वैद्यकिय सेवांची उपलब्धता करून द्यावी.
जेणेकरून येथील गोरगरीब जनतेस प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा उपलब्ध होईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रवीण बैकर, संदीप पानवलकर,सुधीर पाटील,सुदाम वाघीलकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.