नांदगाव पंचक्रोशीत डोळ्याची साथ

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
दुपारी रणरणते ऊन संध्याकाळी गडगडाटासह पाऊस पहाटे थंडी अशा बदलत्या विपरीत वातावरणाच्या परिणामामुळे व वाढत्या तापमानामुळे मुरुड तालुक्यातील यशवंतनगर पंचक्रोशीत डोळे येण्याची साथ पसरली आहे. डोळे सुजणे,चुरचुरणे,लाल होणे,पाणी येणे, त्यातून घाण बाहेर येणे, बघण्याला त्रास होणे आदी लक्षणांनी या साथीचे रुग्ण अक्षरशः वैतागून गेले आहेत. विहुर, मजगाव, नांदगाव व अन्य गावातील अनेक रुग्ण या साथीने हैराण झाले आहेत.विशेष म्हणजे या दिवसात बहुतांशी शाळांमध्ये प्रथम सत्रांत परीक्षा सुरू आहेत. त्यापैकी काही शाळांतील लहान मुले डोळे येण्याच्या समस्येने हैराण झाले आहेत.खाजगी तथा शासकीय रुग्णालयांत या साथीने ग्रस्त रुग्ण उपचार घेतांना तसेच डोळ्यांवर काळे गॉगल लावून वावरताना दिसून येत आहेत.

हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे डोळ्यात आयड्रॉप्स टाकून काळजी घ्यावी,प्रखर उन्हात फिरु नये.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे , लहानग्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले आहे.

Exit mobile version