नारायण राणेंची शरद पवारांना थेट धमकी; संजय राऊतांचा भडका

। मुंबई । प्रतिनिधी ।
बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. आता राणेंच्या याच धमकीचा समाचार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत नारायण राणे यांना थेट सवाल विचारला आहे. शरद पवारांना राणेंनी दिलेली धमकी भाजपची भूमिका आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल… पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही.

काय म्हणाले होते नारायण राणे?
राज्यातील सत्तापेचानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी बाहेर गेलेल्या आमदारांना परत यावंच लागेल, असं स्पष्ट केलं. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये राणे म्हणाले की, “माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.

शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले होते की, “बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटतोय. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इकडे यावंच लागेल.

Exit mobile version