नरेंद्र भुसाणे यांना अटक

पाच दिवस पोलीस कोठडी

| श्रीवर्धन | वार्ताहर |

मागील पाच वर्षांपासून फरार असलेले जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक व श्रीवर्धनचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र वसंत भुसाणे यांना श्रीवर्धन पोलिसांनी कोपरखैरणे नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. नरेंद्र भुसाणे यांच्यावर पतसंस्थेमध्ये सुमारे चार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. 2 ऑगस्ट 2022 रोजी शासकीय लेखा परीक्षकांनी नरेंद्र भुसाणे यांच्यावर श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पतसंस्थेत घोटाळा झाल्यानंतर नरेंद्र भुसाणे श्रीवर्धन येथे आले असता त्यांना ठेवीदारांनी मारहाण करण्याची घटना देखील काही वर्षांपूर्वी घडली होती. मागील पाच वर्षांपासून नरेंद्र भुसाणे हे पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर श्रीवर्धन पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे त्याचप्रमाणे पोलीस हवालदार टेकाळे, पवार, कांबळे इत्यादींनी भुसाणे याला अटक करण्यामध्ये कामगिरी बजावली. नरेंद्र भुसाणे यांना श्रीवर्धनच्या न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version