नर्गिस अंतुले अनंतात विलीन

जयंत पाटील यांच्याकडून अंतुले कुटुंबियांचे सांत्वन

| आंबेत | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्याचे माजी आठवे मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय आरोग्यमंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचं बुधवारी (दि. 20) रात्री 11 वाजता निधन झाले. निधनसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या. मुंबई येथील मूनलाईट बंगल्यावर त्या वास्तव्याला होत्या. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. 21) आंबेत या मूळ गावी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी नर्गिस अंतुले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच अंतुले कुटुंबियांचे सांत्वन केले.

बॅ. अंतुले यांच्या मुख्यमंत्री काळात नर्गिस अंतुले यांनी त्यांना भक्कम साथ देत राजकीय कारकीर्द आणि अल्पसंख्याक समाजाला एकवटण्याचं काम केलं होतं. त्यांच्या जाण्याने कोकणवासियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गोरगरीब जनता, सामान्य नागरिक यांना त्या काळात पेन्शन मिळवून देण्याकरिता नर्गिस अंतुले यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती. त्यामुळे आजही त्यांच्या मूळ गाव समजल्या जाणार्‍या आंबेतमधील जनता त्यांची आठवण काढते. त्यांच्या आंबेत येथील निवासस्थानी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्याकरिता शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, खा. सुनील तटकरे, आ. रवींद्र पाटील, काँग्रेसचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, श्रीनिवास बेडखले, अस्लम राऊत, बबन मनवे, समीर बनकर, नाझीम हसवारे आदींसह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होते.
दरम्यान, आ. जयंत पाटील यांनी माजी आमदार आणि नर्गिस अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांचे सांत्वन केले.

Exit mobile version