राष्ट्रीय फिल्ड आर्चरी धनुर्विद्या स्पर्धा
। लखनौ । प्रतिनिधी ।
15 वी राष्ट्रीय इनडोअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2024-25 उत्तरप्रदेश राज्याची राजधानी लखनौ येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या धनुर्धरांनी उत्तरप्रदेशात आपल्या नेमबाजीचे कर्तब दाखवीत वर्चस्व सिद्ध केले. संपूर्ण देशातून स्पर्धेसाठी निवड झालेल्या सुमारे 1 हजार धनुर्धरांवर मात करीत राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने अजिंक्यपद पटकावले आहे. दुसर्या स्थानावर उत्तरप्रदेश आणि तिसर्या स्थानावर पुद्दुचेरीला समाधान मानावे लागले. महाराष्ट्राने सलग 15 वेळा अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे.
या स्पर्धेत नाईन स्पॉट हा रोख पारितोषिक असणारा प्रकार आकर्षण ठरला. या प्रकारात संपूर्ण देशातील तब्बल 28 धनुर्धर आपले कौशल्य दाखविण्यासाठी सहभागी झाले होते. बाद फेरी असणार्या या प्रकारात महाराष्ट्राच्या अखिलेश भोसले या धनुर्धराने उत्तरप्रदेशच्या गुरुविंदर सिंगवर मात करीत 1 लाखाचे पारितोषिक पटकावले. अखिलेश याने सलग दुसर्यांना ही स्पर्धा जिंकली. 15 व्या राष्ट्रीय इनडोअर धनुर्विद्या स्पर्धेतील नाईन स्पॉट प्रकारात जिंकण्यासाठी अखिलेश आणि गुरुविंदर यांना तब्बल पावणे दोनशे बाण मारून आपल्या 26 प्रतिस्पर्ध्यांवर मात करावी लागली. स्पर्धेचा शेवट क्रीडा रसिकांची उत्कंठा वाढविणारा होता.
बेअर बो राऊंड या धनुर्विद्या प्रकारात 7 वर्षाखालील, 10 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील, 19 वर्षाखालील, वरिष्ठ गट आणि 35 वर्षावरील गटांमध्ये इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड ही राष्ट्रीय आर्चरी अजिंक्यपद स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत प्रथमच 7 वर्षाखालील धनुर्धरांची स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा क्रीडा रसिकांचे आकर्षण ठरली.
रायगडच्या धनुर्धरांचा अचूक निशाणा
15 व्या राष्ट्रीय इनडोअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील 13 धनुर्धारांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेत करण्यात आली होती. रायगड मधील बावलेकर अर्चरी अकॅडमीमधील मुख्य मार्गदर्शक संतोष जाधव, लाभेश तेली यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्या शिकणार्या या 13 धनुर्धरांनी साजेसा खेळ करीत रायगड जिल्ह्याचे नाव देशपातळीवर गाजवले. या खेळाडूंमध्ये कंपाऊंड राऊंड 10 वर्षाखालील गटात रुधिरा जाधव सुवर्णपदक, इंडियन राऊंड 10 वर्षाखालील गटात अर्जुन म्हात्रे रौप्यपदक, स्वहा कदम रौप्यपदक व सुवर्णपदक, क्षितीका महाले रौप्यपदक , इंडियन राऊंड 14 वर्षाखालील गटात आशय आंग्रे सुवर्णपदक, मुग्धा वैद्य सुवर्ण व कांस्यपदक, अंश पराडकर सुवर्णपदक , दिव्यनिल दत्ता 2 सुवर्णपदक, कंपाऊंड राऊंड 14 वर्षाखालील गटात तनीषा वर्तक सुवर्णपदक, अथर्व पाटील रौप्य आणि कांस्यपदक, आरव हुलवान रौप्यपदक आणि सई पिळणकर हिने सुवर्णपदक पटकावले आहे. पुरुष वरिष्ठ गटात कंपाऊंड राऊंडमध्ये लाभेश राजेंद्र तेली यांनी 1 रौप्यपदक आणि 1 कांस्यपदक पटकावले.







