रायगडमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकऱणाच्या वतीने शनिवारी (दि.11) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये या लोकन्यायालय आयोजित केली जाणार आहेत. दाखलपुर्व आणि प्रलंबित प्रकरणांच्या निपटारा या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी दिली. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

58 हजार प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय लोकन्यायालच्या माध्यमातून केला जाणार आहे. यात बँकांची थकीत कर्ज वसूली, वीज बिलांची थकीत वसूली, कामगार आणि व्यवस्थापनांमधील वाद, भुसंपादनाशी निगडीत प्रकरणे, महसुल निगडीत प्रकरणे, पाणी पट्टी आणि घरपट्टी थकीत वसूली प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण प्रकरणे, कौटुंबिक वाद, दिवाणी प्रकरणे व इतर प्रकरणांचा समावेश असणार आहे.

खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत, हा यामागचा मुळ उद्देश आहे. अलिबागसह जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये एकाच वेळी या लोकअदालत पार पडणार आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या लोकअदालतीत सहभागी होऊन तडजोडीने प्रलंबित प्रकरणांचा निपटार्‍यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

Exit mobile version