। मुंबई । प्रतिनिधी ।
मावळी मंडळाचे विश्वस्त, ज्येष्ठ कबड्डी खेळाडू व राष्ट्रीय पंच जोसेफ फर्नांडिस यांचे वार्धक्याने मंगळवारी (दि.14) रहात्या घरी निधन झाले. निधना समयी ते 74 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी ते अत्यावस्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दहा दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले होते. पण त्यातून ते सावरू शकले नाही. बुधवारी ठाण्यातील सेंट जॉन शाळेतील दफन भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सलग सात दशकापेक्षा अधिक काळ राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन करणार्या संस्थेचा धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. अनेक संस्थेतील कार्यकर्त्यांना ते मोलाचे मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या निधनाने कबड्डीतील एका उत्कृष्ट मार्गदर्शकाची उणीव नेहमीच जाणवत राहील. अशा प्रकारे कबड्डीतील तमाम खेळाडू व संघटकानी शोक व्यक्त केला. त्यांची शोकसभा बुधवारी (दि.22) सायंकाळी 6 वाजता मावळी मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.