| अलिबाग | प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील वृत्तपत्र छायाचित्रकार प्रशांत दिवेकर यांचे शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या तिव्र धक्याने निधन झाले. त्यांचे वय 54 होते. दैनिक पुढारीच्या प्रतिनिधी सुवर्णा दिवेकर यांचे ते पती होत.
शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते घरातच पडले असता त्यांच्या डोक्याला मुकामार लागला. त्यामुळे त्यांना भोवळ आल्यासारखे झाल्याने त्यांना तत्काळ येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या सांगण्यानूसार दिवेकर यांना सत्वर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रशांत दिवेकर यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना मृत घोषीत केले.
प्रशांत दिवेकर यांच्या पार्थिवावर शनिवारी येथील रामनाथ वैकुंठभूमी स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुवर्णा दिवेकर, पुत्र सुयश दिवेकर आणि चुलत भाऊ असा परिवार आहे.
प्रशांत दिवेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अलिबाग व्यापारी असोसिएशनने अलिबाग बाजारपेठ बंद ठेवली होती. तर शुक्रवारी रात्री शनिवारी सकाळी जिल्ह्यातील पत्रकार, छायाचित्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी दिवकर यांच्या घरी जाऊन दिवेकर कुटूंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या अंत्ययात्रेत देखील पत्रकार, छायाचित्रकार, व्यापारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.
प्रशांत दिवेकर यांनी कोकणातील विविध वृत्तपत्रांकरिता वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कामे केले होते. प्रारंभीच्या काळात रायगड जिल्हा माहिती कार्यालयाकरिता देखील काही काळ छायाचित्रकार म्हणून काम केले होत. रायगड जिल्हा छायाचित्रकार संघटनेचे देखील ते सदस्य होते. एक अत्यंत मनमिळाऊ आणि हसतमुख व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा विविध क्षेत्रातील मित्रपरिवार खुप मोठा होता. सामाजिक कार्यातही ते सातत्याने आघाडीवर असत. त्यांच्या अकाली निधनाने अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.