| पुणे | प्रतिनिधी |
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. चिंचवड गावांमध्ये चंद्रकांत पाटील हे एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता त्यांच्यावर हा शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चोख पोलीस बंदोबस्त असूनही काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला केला आहे. चंद्रकांत पाटील हे आज चिंचवड गावात मोरया गोसावी महोत्सवासाठी हजर झाले आहेत त्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला झाला. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक हल्ला झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित झाले आहेत.
थोर महापुरुषांबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील हाय हाय च्या घोषणाही देण्यात आल्या होत्य. त्यातच चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. शाईफेक करणार्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या चेहर्यावरच शाईफेक करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शिवाय पोलिसही या शाईफेकमुळे क्षणभर गोंधळले होते. शाईफेक करणार्या कार्यकर्त्याकडून घोषणाबाजीही करण्यात आली. चंद्रकांत पाटील सध्या एका माजी नगरसेवकाच्या निवासस्थानी थांबले आहेत. काही वेळातच ते मोरया गोसावी समाधी मंदिराच्या कार्यक्रमस्थळी रवाना होणार आहेत, असे येथील पक्षाच्या पदाधिकार्यांनी सांगितले. दरम्यान कार्यकर्त्यांसह पोलिसांचाही या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात आहे.