राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठस्तरीय पुरस्कार जाहीर

जेएसएमचा प्रसाद अमृते उत्कृष्ट स्वयंसेवक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

2019-20 चे राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) पुरस्कार मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रसाद नरेंद्र अमृते यास सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव, प्रा. शैलेंद्र देवळाणकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. प्रसादने मिळविलेल्या या यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्याला गौरविण्यात आले. नॉट मी बट यु या ब्रीद वाक्याला अनुसरून 2019-20 मध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत योग दिन, वृक्षारोपण कार्यक्रम, स्वच्छता अभियान, स्वच्छता पंधरवडा, मतदान, जनजागृती अभियान, एड्स जनजागृती अभियान, परिसर व सागरी किनारा स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती अभियान, स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, महिलांसाठी जनजागृती, रक्तदान शिबिरे, सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदत, वृद्धाश्रमाला भेट, आजी-आजोबांचा फराळ व कंदील वाटप आदी उपक्रम एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा.अद्वैत घटपांडे, डॉ.प्रवीण गायकवाड, प्रा.श्‍वेता पाटील यांच्या सामूहिक प्रयत्नातून राबविले गेले होते.

त्या अनुषंगाने सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तरीय बेस्ट एन.एस.एस. युनिट, प्रसाद अमृते यास विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार व प्रा. अद्वैत घाटपांडे यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून गौरविण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनिल पाटील यांनी दिली.

Exit mobile version