रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम सुरू

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात क्षयरोग्यांना शोधण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू केली आहे. दि. 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान ही शोध मोहीम होत आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सुरेश देवकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात 1 जानेवारी 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या दरम्यान क्षयरोगाचे दोन हजार 794 रुग्ण शोधण्यात आले आहेत. हे रुग्ण शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील आले आहेत. आजही समाजात असे आणखी काही क्षयरुग्ण असण्याची शक्यता आहे. या रुग्णांना शोधून त्यांना क्षयरोगमुक्त करण्यासाठी सक्रीय क्षयरोग रुग्ण शोधमोहीम 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही राबविण्यात येत आहे. ही शोधमोहीम जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिजोखमीच्या भागात आशा स्वयंसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, समुदाय वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे.
आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन लक्षणे असणार्‍या संशयित रुग्णांची माहिती घेऊन जवळच्या आरोग्य संस्थेत देऊन तपासणी करणार आहे. संशयिताची थुंकी नमुने तपासणीसह एक्सरे मोफत काढले जाणार आहेत. ज्यांचा तपासणी निष्कर्ष अहवाल रोगासाठी पॉझिटिव्ह येईल त्यांच्यावर 6 ते 28 महिन्यांपर्यंत औषधोपचार करण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक रुग्णाला प्रतीमहिना पाचशे रुपये निक्षय पोषण योजना यासाठी भत्ताही दिला जाणार असल्याचे डॉ. देवकर यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या सुमारे 29 लाख 83 हजार 785 इतकी आहे . त्यापैकी या शोध मोहिमेसाठी 85 हजार 889 घरातील चार लाख 29 हजार 447 इतकी लोकसंख्या निश्‍चित करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी लागणार्‍या पथकांची संख्या 216 आहे. या सर्वेक्षणासाठी 43 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गावपातळीवरील आशासेविकांना या मोहिमेसाठी आवश्यक फॉर्म्स, बेडका नमुना तपासणी पात्र, संदर्भ सेवा पत्रे इत्यादी पोच करण्यात आलेली आहेत. या मोहिमेसाठी तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी हे पर्यवेक्षक व सनियंत्रण करतील. वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय हे संशयित रुग्णांच्या बेडका तपासणी व क्ष-किरण तपासणी याबाबत प्रशिक्षण व संशोधन करतील.
दरम्यान, गेल्या दीड वर्षाच्या कोरोनाच्या काळात रायगड जिल्ह्यात क्षयरुग्णांची संख्या घटताना दिसत आहे, मात्र ही घट कशामुळे निर्माण झाली आहे, याचाही शोध त्यामुळे यातून घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात होणार्‍या या विशेष सर्वेक्षण मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. देवकर यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस डॉ. सुरेश ठोकळ, सतीश दंतराव, मनोज बामणे, वृषाली पाटील, आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version