सहकार्य करण्याचे अधिकार्यांचे आवाहन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्वतंत्र भारत अमृत महोत्सव निमित्त रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेची दुसरी फेरी रायगड जिल्ह्यातील तालुके, गाव, वाडी, वस्ती, पाडा, इटभट्टी, तांडे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी या सर्व ठिकाणी दि.1 डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत दोन्ही मोहिमा राबविण्यात येत असून या कालावधीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार असून त्याची सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सक्रिय कुष्ठरोग शोध मोहिमेची दुसर्या फेरीचे पेण येथील ए.सी.डी. खाजगी शाळेत शुभारंभ करण्यात आले. यावेळी कुष्ठरोगावरचे वेगवेगळ्या टप्प्यावर चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी तामिळनाडू येथील चंगलपट्टू कुंष्ठरोग मध्यवर्ती विभागाचे उपसंचालक डॉ.भगत यांनी केले. तसेच पेण येथील ए.सी.डी. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः जमा केलेल्या तांदळाचे यावेळी कुष्ठरोग असलेल्या रुग्णांना प्रत्येकी 10 किलो प्रमाणे तांदूळ वाटप करण्यात आले. रायगड जिल्ह्यात एकूण 15 तालुके असून 20 लक्ष 51 हजार 653 लोकसंख्येमध्ये या सर्वेक्षणाची दुसरी फेरी घेण्यात आली आहे. रायगड जिल्हा कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग मुक्त करण्याचा मानस आहे. त्यासाठी आरोग्य सेवक सेविका यांच्या मार्फत घरोघरी जावून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.