हंगामी समितीचा निर्णय, तयारी नसल्याचे कारण
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वयोगटाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून ही स्पर्धा आता 28 फेब्रुवारीपासून पतियाळा येथे होणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही स्पर्धा पुढील आठड्यात ग्वाल्हेर येथे नियोजित होती.
कुस्ती संघटनेच्या प्रशासनाची सूत्रे सध्या हंगामी समितीकडे आहेत. त्यांनी 15 आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्पर्धेची घोषणा केली होती. इतक्या कमी वेळेत आम्ही संघाची तयारी करू शकत नाही, असे काही राज्यांनी त्यांना कळवले होते. त्यामुळे हंगामी समितीने हा निर्णय घेतला. कार्यक्रमानुसार 20 आणि 15 वर्षांखालील फ्रीस्टाईल ग्रीको रोमन यांच्यासह महिलांचाही राष्ट्रीय स्पर्धा पतियाळा येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संकुलात 28 फेब्रुवारी ते 5 मार्च यादरम्यान होणार आहे, असे हंगामी समितीचे प्रमुख भुपेंदर सिंग बाजवा यांनी सांगितले.
काही राज्य संघटनांनी संघांच्या तयारीसाठी कलेली मागणी रास्त आहे. त्यांनाही त्यांचे संघ निवड चाचणीद्वारे निवडावे लागणार आहेत, हा सर्व विचार करून आम्ही राष्ट्रीय स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, असे बाजवा यांनी सांगितले. राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवणारे तसेच प्रभाव पाडणारे खेळाडू हे देशाचे भवितव्य असणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे मूळ राष्ट्रीय स्पर्धा अतिशय स्पर्धात्मक व्हावी, हा विचारही आम्ही केला, असे बाजवा म्हणाले.
दोन वयोगटांतील या राष्ट्रीय स्पर्धेत 18 ते 20 राज्यांचे संघ सहभागी होतील आणि अंदाजे 1200 के 1400 खेळाडू सहभाही होतील, अशी माहिती बाजवा यांनी दिली. याच हंगामी समितीने गेल्या आठवड्यात जयपूरमध्ये सिनियर गटाची राष्ट्रीय स्पर्धा घेतली होती.