। तळा । वार्ताहर ।
केंद्र सरकारने राबविलेल्या धोरणामुळे राज्यात व देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. याविरोधात तळा राष्ट्रवादी काँग्रेच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला असून, तळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले असून, सीएनजीचे दरही वाढले आहेत. इंधनच महाग झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भावदेखील कडाडले आहेत. गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने ज्यांच्या हातात घराचं अर्थसंकल्प आहे अशा महिला भगिनींना घरखर्च चालविणे अवघड झाले आहे. आणि म्हणूनच खासदार सुनील तटकरे तसेच पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उमा मुंढे यांच्या नेतृत्वात तळा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने तहसीलदार तळा यांना महागाईविरोधात निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी तळा तालुका महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे, तळा शहर अध्यक्षा मेघा सुतार, आयेशा पलवकर, शेनवली सरपंच निकिता गायकवाड, शहर युवती अध्यक्ष दिव्या वडके, नगरसेविका सारिका, रंजना पिसाळ आदी महिला उपस्थित होत्या