रामेश्वर येथे श्रमदानातून निसर्ग संवर्धन

| पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या चार शिव मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे ‘रामेश्वर’, यालाच ‘वरचे रामेश्वर’ सुद्धा म्हणतात. काळाच्या ओघात येथील पुरातन विहीर गाळाने भरलेली होती. तसेच, दीपमाळेची देखील पडझड झाली होती. जल, निसर्ग, वृक्ष व पुरातन वास्तु यांचे संवर्धन करण्याच्या हेतूने निसर्गमित्र, पनवेल या संस्थेने 24 ते 26 मे या कालावधीत श्रमदान करून येथे विविध संवर्धनाची कामे पार पाडली.

या मोहिमेत अंदाजे 60 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यात तरुण तरुणी, स्त्री पुरुष सर्वांनीच श्रमदान केले. या मोहिमेचे लीडर्स होते सचिन शिंदे व प्रिसिलिया मदन. गड संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेणारा राज इंदवटकर तसेच पीयुष तरटे हे देखील या मोहिमेचा भाग होते. प्रदीप लांगी व राजेश दापसे या स्थानिक कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले. श्रमदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य ग्रामस्थांनी पुरवले.

बेसुमार उपसा व गाळाने भरलेले पाण्याचे स्त्रोत, यामुळे पाण्याचा प्रश्न जटिल बनला आहे. श्रमदान करून विहीरीसारखा पाण्याचा स्त्रोत पुनर्जीवित करण्याचा हा प्रयत्न इतरांना दिशादर्शक ठरेल हे मात्र नक्की. अशाच मोहिमेतून पुढील कार्यकर्ते घडतात व हेच कार्यकर्ते भविष्यात समाजाला दिशा देतात.

श्रमदानातून केलेली कामे

जलसंवर्धन
वरचे रामेश्वर येथील ऐतिहासिक विहीरीचे पुनर्जीवन
देवराईत वाहणाऱ्या ओढयांवर 3 बंधारे घातले
गणेश कुंडातील पाणी उपसून गाळ काढला
निसर्ग व वृक्ष संवर्धन
देवळाच्या परिसरात बहावा, वड, मोह, बेल अशी 8 झाडे लावली
हजारो बिया (आंबा, फणस, चिंच, करवंद, लिंब, सीताफळ आदी.) परिसरात व देवळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा लावल्या.
पुरातन वास्तू संवर्धन
दगडी उंच दीपमाळेचा पार रुंद करून त्याचा पाया अधिक मजबूत केला.
Exit mobile version