तिघांचा मृत्यू, 100 जणांना वाचण्यात यश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात निसर्गाचा रुद्रावतावर पाहावयास मिळाला. रविवारी (दि. 20) पहाटे अचानक झालेल्या ढगफुटीने संपूर्ण परिसर हादरुन गेला असून, गारपीट आणि भूस्खलनामुळे अचानक पूर आला. यामुळे 40 घरांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीतून 100 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरस्थितीमुळे अनेक घरे व वाहने भूस्खलनात गाडली गेली आहेत. या संकटामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी रात्री रामबन परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार गारपीट झाली. तसेच जोरदार वारे आणि पावसामुळे भूस्खलनही झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे आणि दुर्दैवाने यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 100 जणांना वाचवण्यात आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांच्या मालमत्तेचे तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या कुटुंबांना सर्व प्रकारची मदत पोहोचवण्यात येत आहे.
या पर्जन्यवृष्टीचा कुंड गावाला सर्वात जास्त फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीतून 100 हून अधिक ग्रामीण लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नाशरीपासून बनिहालपर्यंत जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्ग (एनएच 44) वर मोठ्या पावसामुळे आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.धरम कुंड गावात पुरामुळे सुमारे 40 घरांचे नुकसान झाले आहे. धुके आणि पाऊस असूनही, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. वाहतूक विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाऊस अजूनही सुरूच आहे, त्यामुळे रस्ता मोकळा होईपर्यंत आणि हवामान सुधारेपर्यंत प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासकीय पथके परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि मदतकार्य सुरू आहे.
श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद
नाशरी ते बनिहालदरम्यान जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (एनएच 44) वर सुमारे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि मातीची झडप पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर अजूनही मुसळधार पाऊस सुरूच असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती साचल्यामुळे वाहने अडकून पडली आहेत.
धरम कुंड गावात भीषण पूर
रामबनच्या धरम कुंड गावात अचानक आलेल्या पूरामुळे जवळपास 40 घरे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत. गावात अनेक ठिकाणी पाणी शिरल्यामुळे लोकांनी घाबरून उंच भागात आसरा घेतला. स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन विभागाच्या पथकांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेत, 100 हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
वाहनेही वाहून गेली
संपूर्ण गावात उफानलेल्या नाल्यांमुळे अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, नदी-नाल्यांमध्ये अचानक वाढलेला पाण्याचा स्तर लोकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी श्रीनगर महामार्गाचा वापर न करण्याची सूचना देण्यात आली आहे.
पावसामुळे घरात पाणी
पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे लागले आहे. वृद्ध, लहान मुले आणि रुग्ण या परिस्थितीत विशेषतः त्रस्त झाले आहेत. त्यांच्यासाठी अन्न, औषधं आणि निवार्याची व्यवस्था करणे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरु
प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य सुरू केले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक प्रशासनाचे पथक संकटग्रस्त भागांमध्ये तातडीने काम करत आहेत. खराब हवामान आणि दुर्गम भूप्रदेशामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे येत असूनही प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पर्यटकांना सावधगिरीचा इशारा
काश्मीरमध्ये सध्या घनदाट धुके आणि पावसामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि प्रवाशांना हवामानात सुधारणा होईपर्यंत अनावश्यक प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, प्रशासनाने स्थानिक नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाचा इशाराहवामान विभागाने पुढील 48 तास काश्मीर खोर्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा जारी केला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिकांचे जीवन विस्कळीत
या नैसर्गिक आपत्तींमुळे संपूर्ण रामबन जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळा, बाजारपेठा बंद असून, विद्युत आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. नागरिक जीवनावश्यक वस्तूंसाठी धडपडत आहेत. प्रशासनाकडून तात्पुरत्या निवार्यांची व्यवस्था करण्यात आली असून, अन्न व औषधं पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.