‘धनेश’ वाचविण्यासाठी निसर्गप्रेमी एकवटले

। चिपळूण । प्रतिनिधी ।

जंगलतोडीमुळे प्रजाती अस्तित्त्वाच्या भवितव्यासाठी धडपडणार्‍या ‘हॉर्नबिल’ अर्थात ‘धनेश’ पक्ष्याला वाचविण्यासाठी आता निसर्गप्रेमी पुढे आले आहेत. जिल्हाभरात चळवळ उभी करण्याच्यादृष्टीने धनेशची घरटी असलेल्या ठिकाणांची माहिती गोळा करण्यासाठी गावोगाव सरपंचांसह निसर्गप्रेमींना आवाहन करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. तसेच, चिपळूण शहर परिसरात ‘हॉर्नबिल फूड प्लान्ट नर्सरी’ उभारण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. या संदर्भात नुकतीच पर्यावरण व पक्षी निरीक्षक अभ्यासकांची बैठक झाली.

देवरूख येथील नर्सरीच्या धर्तीवर चिपळूण अर्थात उत्तर रत्नागिरी विभागासाठी उपयुक्त ठरेल, अशी नर्सरी उभारण्याकरिता प्रयत्न सुरू झाले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘हॉर्नबिल अर्थात धनेश’ या पक्ष्याच्या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी त्याचबरोबर अन्य दुर्मीळ होत असलेल्या पक्ष्यांबाबत अभ्यास करण्यासाठी चर्चा करण्यात आली. धनेश पक्ष्याची प्रजाती पर्यावरण व निसर्ग संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. या प्रजातीमध्ये भविष्यात वाढ होण्याकरिता आता पक्षी अभ्यासक पर्यावरण व निसर्गप्रेमींनी चळवळ उभी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याकरिता जिल्हाभरातील गावागावातून निसर्गप्रेमींसह गावातील प्रमुख गावकर, सरपंच यांच्या माध्यमातून धनेशची घरटी असलेल्या झाडांची व ठिकाणांची माहिती गोळा करण्याकरिता नियोजन सुरू झाले आहे. त्यानुसार लवकरच संबंधित व्यक्तिंना संपर्क करून अशी माहिती निसर्गप्रेमींकडे कशाप्रकारे पाठवावी, याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे.

Exit mobile version