पहिल्याच पावसात निसर्गाचा तडाखा

चौल-भोवाळे मार्गावर वृक्ष कोसळला; शाळकरी विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय

। अलिबाग । प्रतिनिधी ।

हवामान विभागाने दिलेल्या येलो अलर्टचा पहिला फटका अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे परिसराला बसला. मंगळवारी (दि.24) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत असलेला भला मोठा आकाशी वृक्ष अचानक कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.

सकाळच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावर झाड आडवे पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. भोवाळे येथील अभय फुंडे, किशोर ठाकूर, जयवंत घरत, आर्यन मिसाळ, अजिंक्य मिसाळ आणि निखिल खारकर यांनी पुढाकार घेत झाडाच्या फांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. युवकांच्या तत्परतेमुळे वाहतूक पूर्ववत झाली आणि मोठा अनर्थ टळला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे. पावसाळ्यात रस्त्यालगतची धोकादायक झाडे, वीजवाहिन्या व परिसरातील धोकादायक ठिकाणांबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version