स्व.पिंट्याशेठ पाटील चषक स्पर्धेत नवगाव क्रिकेट संघ ठरला विजयी

। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील हमरापूर येथे स्व.पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठानतर्फे दुर्गादेवी क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्व. पिंट्याशेठ पाटील चषकाचा मानकरी अलिबाग तालुक्यातील नवगाव, थळ हा संघ ठरला आहे. तरुणांचा लाडका नेता असणार्‍या स्व. पिंट्याशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ हमरापूर येथील दुर्गादेवी क्रिकेट क्लबच्या वतीने खुल्या गटाचे ओव्हर आर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन हमरापूर फाटा येथील भव्य मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेत पेण तालुक्यासह पनवेल, अलिबाग, खालापूर येथील एकूण 32 संघानी भाग घेतला होता. उपांत्य फेरीत दादर व भाल संघात लढत झाली त्यात जाणता राजा दादर हा संघ विजयी ठरला. त्यानंतर अंतिम लढत ही चुरशीची झाली. त्यात प्रथम क्रमांक माऊ 11 नवगाव-अलिबाग तर द्वितीय क्रमांक बापेश्‍वर उर्णोली पेण, तृतीय क्रमांक जाणता राजा दादर व चतुर्थ क्रमांक एचसीसी भाल-पेण या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.


स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून बापेश्‍वर उर्णोली संघाच्या सुनिल पाटील याला बाईक बक्षिस स्वरुपात देण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षिस वितरणासाठी माजी आ. धैर्यशील पाटील, स्मिता पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, मनोहर पाटील, सुभाष दाभाडे, अनिल पाटील, किशोर पाटील, लहु ठाकूर, कृणाल पाटील, राकेश दाभाडे, अंकित भगत, विनोद नाईक, सचिन शेलार, सचिन गोलिमडे, संदिप पाटील, सतीश पाटील आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version