| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श नवघर शाळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयएसओ 9001:2015 मानाकंन प्राप्त झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शैक्षणिक व भौतिक सुविधा आणि उत्तम व्यवस्थापन या निकषाची तपासणी करून शाळेस मानाकंन प्राप्त झाले आहे. सुधागड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे यांच्या हस्ते केंद्रप्रमुख अनिल राणे यांच्या उपस्थितीत नवघर शाळेस शनिवार, दि. 26 मानाकंन प्रदान करण्यात आले आहे. मानाकंन प्राप्त झाल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्यामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे व संतोष शेडगे यांच्या प्रेरणेतून व पंचायत समिती सुधागड गटविकास अधिकारी लता मोहिते, गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे, वरिष्ठ विस्तार अधिकारी नवनाथ साबळे, केंद्रप्रमुख अनिल राणे यांच्या मार्गदर्शनातून शाळेला हे यश मिळाले आहे.
शाळेच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी दानशूर संस्था,ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी या सर्वांच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा शाळेने पूर्ण केल्या असून ग्रामीण भागातील उत्कृष्ट शिक्षण देणारी शाळा म्हणून नावलौकिक मिळवला असून सर्वांच्या सहकार्याने मानाकंन प्राप्त केले आहे त्या बद्दल पेडली केंद्राचे केंद्र प्रमुख अनिल राणे, शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद म्हात्रे, संगीता बैकर, वृषाली गुरव, शीतल पाटील, अनुजा माने, रुपाली लेंडवे, अंकिता जाधव यांचा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यानिमित्त नवघरच्या सरपंच माई चव्हाण, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश जाधव, सदस्य निलेश जाधव, रोशनी चव्हाण, पूनम वाघमारे, अश्विनी वाघमारे, माजी मुख्याध्यापक जगदीश म्हात्रे, व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रविंद्र जाधव, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुनिल जाधव, धनंजय कारेकर आणि ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
शाळेतील भौतिक सुविधा व विविध परीक्षेत यश
प्रशस्त इमारत,शाळेची सुसज्ज संगणक लॅब,आद्ययावत कलामंच,सुसज्ज वाचनालय,शालेय पोषण आणि पोषक आहार ,मोफत आरोग्य तपासणी,मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, ओपन जीम ,इ लर्निंग सुविधा,रंगरंगोटी ,बोलक्या भिंती,डिजिटल वर्ग खोल्या,शिष्यवृत्ती योजना, परीक्षा, जवाहर नवोदय परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन स्पर्धा परीक्षा , पारंपरिक नृत्य,पथनाट्य, समूहगीत गायन, शिल्पकला, लगोर, बेचकीने नेम धरणे अशा विविध स्पर्धेत यश
गेली दोन वर्ष शाळेचा मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना नवघर शाळा मानांकित करण्याचे स्वप्न पाहिले होते. सर्वांच्या सहकार्यातून ते स्वप्न आज साकार होत आहे याचा मनस्वी खूप आनंद होत आहे. शाळा करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
अनिल राणे,
केंद्रप्रमुख, पेडली
आयएसओ मानाकंन प्राप्त करून शाळेने शैक्षणिक व व्यवस्थापन क्षेत्रात एक नवीन पायरी गाठली आहे. शाळा या मानांकनाला अनुसरून आपल्या शैक्षणिक धोरणात आवश्यक बदल करत राहील. भविष्यात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि उत्तम सुविधा देण्यासाठी शाळा कटीबद्ध राहील.
प्रमोद म्हात्रे,
मुख्याध्यापक, शाळा नवघर