नवघरकर डॉक्टर व परिचारिकांच्या प्रतिक्षेत

जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे मागील वर्षा पासून नवघर येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्र हे डॉक्टर व परिचारिकांच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील खेडेगावातील रुग्णांना आपला वेळ, पैसा वाया घालवून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात ये-जा करावी लागत आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य विजय भोईर यांनी आपल्या नवघर या जिल्हा परिषदेच्या मतदार संघातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून सुमारे 48 लाख रुपये खर्च करून नवघर ग्रामपंचायत हद्दीत 2022-23 या वर्षात प्राथमिक आरोग्य उप केंद्राच्या इमारतीची उभारणी केली. मात्र या उप केंद्रात रिक्त असलेली समू उपदेश अधिकारी (सी.एच.ओ), ए एन एम (परिचारिका) पदे मागील वर्षा पासून भरली गेली नाहीत. त्यामुळे एक आरोग्य सेवकच नवघर, पागोटे, भेंडखळ, बोकडविरा, फुंडे, नवीन शेवा, डोंगरी, पाणजे सह इतर ग्रामपंचायत हद्दीतील एकूण 10 गावातील 21 हजार 469 लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय निर्माण होत आहे.

तरी शासनाच्या निकषांवर आधारित आवश्यक असलेली डॉक्टर, समू उपदेश अधिकारी (सी.एच.ओ), ए एन एम (परिचारिका) आणि आरोग्य सेवक यांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नवघर गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोईर यांनी केली आहे.

Exit mobile version