नवी मुंबई विमानतळाला ‘यांचेच’ नाव

वहाळमध्ये घुमला जनतेचा आवाज
शेकाप नेते राजेंद्र पाटील उतरले मैदानात
। पनवेल । वार्ताहर |
सिडको आस्थापनाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कुणाचे द्यावे? याचा वाद सध्या भलताच चिघळला आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र मात्र नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार या भूमिकेवर ठाम आहेत. 24 जून रोजी दि.बा.पाटील यांच्या जयंतीच्या औचित्याने प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र बांधव सिडको कार्यालयाला घेराव घालणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी वहाळ येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रविवारी (दि.20) जनतेचा आवाज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

वहाळ, बामण डोंगरी, मोरावे, जावळे गणेशपुरी आणि उलवे नोड येथील नागरीक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राजेंद्र पाटील म्हणाले की, माजी खा. दि. बा. पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे दैवत आहेत, भूमिपुत्रांचे कैवारी आहेत, आमचे उद्धारकर्ते आहेत. त्यांचे नाव प्रकल्पग्रस्तांच्या अंतःकरणात कोरले आहे. या आंदोलनात कोणीही कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सहभागी होत नाहीये तर दि.बा.पाटील साहेबांचे निस्सीम चाहते या भूमिकेतून प्रत्येकजण आंदोलनात उतरत आहे. येत्या 24 जूनला प्रशासनाने कितीही विरोध केला तरी मोठ्या संख्येने आंदोलनात आम्ही उतरणार आहोत. यावेळी रमेश दापोलकर, अमित मुंगाजी, जगदीश पारींगे, गजानन शिरढोणकर, सीताराम नाईक, प्रमोद कडू, प्रितम नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आज हा मोर्चा काढण्यासाठी प्रशासन आम्हाला परवानगी देत नाही. माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील हे आमची अस्मिता आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात, आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे. ही अस्मिता घेऊन आपण लढलो होतो. त्यावेळी मोर्चे आंदोलने यासाठी ब्रिटिश सरकारची कधी कुणी परवानगी मागितली होती काय?
सुनील म्हात्रे, माजी सरपंच.

Exit mobile version