चार महिन्यांत चार लाख प्रवासी
| उरण | प्रतिनिधी |
व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जवळपास चार लाख प्रवाशांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. देशांतर्गत विमान वाहतुकीत या विमानतळाने अल्पावधीतच महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.
जागतिक ट्रॅव्हल डेटा संस्थाच्या आकडेवारीनुसार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आतापर्यंत 3 लाख 93 हजार 819 प्रवाशांनी प्रवास केला आहे. या कामगिरीमुळे हा विमानतळ देशातील नववा सर्वाधिक व्यग्र देशांतर्गत विमानतळ ठरला आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 उड्डाणे, तर आठवड्याला जवळपास 1100 उड्डाणे सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाणे अद्याप सुरू नसतानाही प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होण्याची शक्यता असून, त्यानंतर प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
विमानतळाचा पहिला टप्पा सध्या कार्यान्वित असून, त्यामध्ये एक धावपट्टी व एक टर्मिनल सुरू आहे. दुसऱ्या धावपट्टीसह नवीन टर्मिनल इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. तसेच, तिसऱ्या धावपट्टीसाठी अभ्यास प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात वर्षाला 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असलेल्या या विमानतळाची क्षमता 2032 पर्यंत वाढवून 9 कोटी प्रवासी प्रति वर्ष करण्याचे नियोजन आहे. त्यावेळी येथे एकूण चार टर्मिनल्स कार्यरत असतील. मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात असून, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण कमी करण्यासाठी याची उभारणी करण्यात आली आहे. अवघ्या चार महिन्यांत देशातील 46 शहरांपर्यंत हवाई सेवा उपलब्ध करून देत या विमानतळाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
