रोज 23 उड्डाणे अन् केवळ 12 तास सेवा
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
येत्या 25 डिसेंबरला नाताळच्या सकाळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले उड्डाण करण्याचा मान एअर इंडिगो या विमान कंपनीला मिळाले आहे. तसेच धावपट्टीवर उतरण्याचा पहिला मानही इंडिगो कंपनीला मिळाला आहे. बंगळूरहून येणारे पहिले विमान सकाळी 8 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे, तर लगेच 8.40 मिनिटांनी इंडिगोचे दुसरे विमान हैदराबादकरिता उड्डाण करेल, अशी माहिती एनएमआयएएलकडून देण्यात आली.
8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए)चे उद्घाटन झाले. त्यानंतर 25 डिसेंबर पासून विमानसेवा नियमित सुरू होणार आहे. या विमानसेवेचे काळजीपूर्वक टप्प्याटप्प्याने कार्यसंचालन सुरू होण्यासाठी मंच स्थापित केला आहे. पहिल्या दिवसापासून प्रवाशांची सुरक्षितता, विश्वसनीयता आणि आरामदायीपणाला प्राधान्य देण्यात येईल.
पहिल्या महिन्यामध्ये एनएमआयए सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत 12 तास कार्यरत असणार आहे. या विमानतळाहून दररोज 23 नियोजित विमानसेवा असणार आहेत. या कालावधीदरम्यान एअरपोर्ट प्रतितास जवळपास 10 फ्लाइट्सचे व्यवस्थापन करणार आहे. एनएमआयए येथे आगमन करणारी पहिली फ्लाइट बंगळूरपासून येणारी इंडिगो असेल, जी सकाळी 8 वाजता एअरपोर्टवर उतरेल. या नंतर इंडिगो सकाळी 8.40 वाजता हैदराबादसाठी उड्डाण घेईल. नवीन एअरपोर्टवरून पहिली आऊटबाउंड सेवा असणार आहे.
फेब्रुवारीपासून सेवा देणार
फेब्रुवारी 2026 पासून एनएमआए हे एअरपोर्ट 24 तास सेवा देणार आहे. एमएमआरच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी दररोज 34 फ्लाइट्स उड्डाण घेणार आहेत. सुव्यवस्थित शुभारंभाच्या खात्रीसाठी एनएमआयए सिक्युरिटी एजन्सीज व एअरलाइन सहयोगी अशा सर्व भागधारकांसोबत सहयोगाने सर्वसमावेशक ऑपरेनशल रेडिनेस अँड एअरपोर्ट ट्रान्स्फर (ओआरएटी) ट्रायल्स करत आहे.







