रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजकांचे रंगकामाला सुरुवात
| पनवेल | प्रतिनिधी |
देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असून कार्यक्रमासाठी भव्य तयारी सुरू आहे.
सिडको महामंडळाने उद्घाटनापूर्वी शहराचे सौंदर्य आणि सोयीसुविधा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुढील सहा दिवसांत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश उच्च स्तरावरून देण्यात आले आहेत. तसेच दुभाजक स्वच्छ करून रंगकाम, हिरवळीसाठी रोप लागवड आणि अनधिकृत ढाबे-हॉटेल्स हटवण्याची मोहीम राबवली जात आहे.
उद्घाटस्थळी सुमारे पाच हजार लोकांसाठी भव्य मंडप उभारला जाणार असून, महायुतीच्या विविध पक्षांचे कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पार्किंग, येण्या-जाण्याची व्यवस्था आणि पाहुण्यांसाठी सुविधा याबाबत सिडको आणि स्थानिक प्रशासन बैठकांद्वारे नियोजन करत आहे. सुरक्षेच्या दृष्टीन नवी मुंबई पोलीस दलासह सिडकोचा दक्षता विभाग, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग संयुक्तरित्या कार्यरत आहेत. याशिवाय विमानतळ प्रकल्पात योगदान देणाऱ्या माजी सनदी अधिकाऱ्यांनाही या समारंभात विशेष सन्मान देण्यात येणार आहे.






