नवी मुंबई ही भविष्यातील जागतिक क्रीडानगरी

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांचे प्रतिपादन

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबईला जागतिक दर्जाची क्रीडानगरी बनवण्याचा संकल्प सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केला आहे. व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि सिडकोचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स फुटबॉल स्टेडियम व खारघर व्हॅली गोल्फ कोर्समधील 18 होल्समधील सुरू असलेल्या विस्ताराच्या प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांना गुरुवार (दि.14) भेट देऊन या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने व नियोजित वेळेत करा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

विजय सिंघल यांनी सिडको मंडळाचा कारभार स्वीकारल्यापासून सिडको मंडळाने हाती घेतलेल्या सर्वच प्रकल्पांना भेटी देऊन प्रत्यक्ष प्रकल्पाची पाहणी करत आहेत. सिंघल यांनी सुरुवात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पापासून केली. गुरुवारीसुद्धा सिंघल यांनी नवी मुंबईला भविष्यात सिडको क्रीडानगरी म्हणून उदयास आणत असल्याचे सांगून ठरविलेल्या कालावधीतच विस्तारीत गोल्फकोर्स प्रकल्प, फूटबॉल मैदानासारखे प्रकल्प पूर्ण करू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, डॉ. कैलास शिंदे, दिलीप ढोले, मुख्य अभियंता एन. सी. बायस, शीला करुणाकरन यांसह प्रकल्पांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यात मानसरोवर गृहनिर्माण प्रकल्प, नावडे व तळोजा गृहनिर्माण प्रकल्प, सेंटर ऑफ एक्सलन्स, सेंट्रल पार्क, खारघर तुर्भे बोगदा जोड मार्ग, खारघर गोल्फ कोर्स आणि खारघर गृहनिर्माण प्रकल्प या प्रकल्प स्थळांना भेट दिली.

सिडकोचे गृहनिर्माण प्रकल्प हे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीकोनातून नियोजित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. खारघर-तुर्भे बोगदा जोड मार्ग हा प्रकल्प परिवहन व कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने व नियोजित वेळेत व्हावी याकरिता संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

विजय सिंघल,
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक
Exit mobile version