नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

430 बॉडी वॉर्न कॅमेरे आणि गाड्यांना डॅश कॅमने मिळणार बळ

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक पारदर्शक आणि हायटेक करण्यासाठी नवी मुंबई पोलीस दलाने कंबर कसली आहे. वाहतूक पोलिसांच्या अंगावर आता बॉडी वॉर्न कॅमेरे दिसणार असून, पोलीस वाहने देखील आता डॅश कॅमने सज्ज होणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कामात अचूकता तर येईलच; शिवाय वाहनधारकांशी होणारे वाद आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींनाही लगाम बसणार आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली असून, या प्रकल्पासाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी) ठाणे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यात एकूण 430 बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा प्रस्ताव असून, त्यासाठी 1.97 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात 98.8 लाख रुपये वितरित झाले असून, 230 कॅमेऱ्यांच्या खरेदीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे पोलीस वाहनांसाठी 100 डॅश कॅमेऱ्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत मंत्रालयाकडून तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरु असून, या कॅमेऱ्यांच्या चाचण्या प्रगतीपथावर आहेत.

अनेकदा वाहतूक नियम मोडल्यावरुन पोलीस आणि नागरिक यांच्यात खटके उडतात. अशा वेळी बॉडी वॉर्न कॅमेरा हा ठोस पुरावा म्हणून काम करेल. तसेच, पोलीस वाहनांवरील डॅश कॅमेऱ्यांमुळे रस्ते अपघात किंवा गुन्हेगारी घटनांचे थेट चित्रीकरण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढणार असून, गुन्हेगारीला चाप बसणार आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवरील खोट्या आरोपांना आळा बसेल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर राहील. तसेच डिजिटल पुराव्यांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत मदत होणार आहे. मिलिंद भारंबे (पोलीस आयुक्त, नवी मुंबई) तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलीस दलाला अधिक कार्यक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे. बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांमुळे पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि डॅश कॅमेऱ्यांमुळे गस्ती दरम्यानच्या घटनांचे अचूक दस्तऐवजीकरण होईल. यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासार्हता अधिक वाढेल.

Exit mobile version