नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई

2 कोटी 9 लाखांची रोकड जप्त

। पनवेल । वार्ताहर ।

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नियुक्त करण्यात आलेल्या फिरते निगराणी पथक व स्थिर देखरेख पथकाने गत दिड महिन्यामध्ये बेकायदेशीररीत्या वाहनातून नेली जाणारी तब्बल 2 कोटी 9 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे, बेकायदा मद्य बाळगणारे व विकणारे, तसेच बेकायदा शस्त्र बाळगणारे व विक्री करणार्‍यांवर देखील धडक कारवाई केली आहे.

मुंबई, ठाण्यात पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडुन प्रयत्न करण्यात येत आहेत. निवडणुक आयोगाकडुन लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, तसेच आचारसंहीतेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांकडुन विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 12 फिरते निगराणी पथक (एफएसटी) तसेच 14 स्थिर देखरेख पथक (एसएसटी) नियुक्त करण्यात आले आहेत.

या पथकाच्या माध्यमातुन बेकायदा नेली जाणारी मोठी रोकड, अंमली पदार्थ, अवैध मद्यसाठा आणि मद्याची वाहतूक करणार्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या पथकाने गत 16 मार्च ते 7 मे या कालावधीत स्थिर देखरेख पथकाने 6 कारवायांमध्ये तब्बल 2 कोटी 9 लाख 10 हजाराची रक्कम पकडली आहे. यात नुकतीच ऐरोली येथे रिक्षातून नेली जाणारी तब्बल 1 कोटी 60 लाखाची रोकड पकडलेल्या रक्कमेचा देखील समावेश आहे. अमली पदार्थ विरोधी कारवाई नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक व पोलीस ठाणे स्तरावर अंमली पदार्थाची तस्करी व सेवन करणार्यांविरोधात देखील मोठी कारवाई केली असून आचारसंहीता लागू झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत अमली पदार्थ तस्करीच्या 28 कारवाया केल्या आहेत.

Exit mobile version