वाढत्या ध्वनीप्रदुषणावरुन पोलिसांची कारवाई
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
वाहनांमधील सायलेन्सरमध्ये अनावश्यक बदल करीत शहरांत विविध कर्णकर्कश आवाज करणार्या वाहनांची संख्या वाढली असल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढले आहे. यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करीत सायलेन्सर जप्त केले होते. अशा 82 सायलेन्सरवर बुलडोझरद्वारे एकाचवेळी कारवाई करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसांनी अशा शांतता भंग करणार्या वाहनांवर पुढील काळात कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पामबीच रस्त्यावर नवी मुंबई मुख्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली. यासाठी मुख्यालयाची पूर्वपरवानगी घेण्यात आल्याचे वाहतूक विभागाने सांगितले.
वाहनांमध्ये विशेषत: दुचाकींमधील हॉर्नच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने सायलेन्सर लावले जात आहेत. मात्र वाहनचालक यात बेकायदा बदल करीत असून यामुळे विविध प्रकारचे कर्णकर्कश आवाज काढले जात आहेत. यामुळे मोठया प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असून नागरिक व इतर वाहनचालकांची शांतता भंग होत असते. अशा बेकायदा बदल केलेल्या वाहनांवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत कारवाई करीत त्यांचे सायलेन्सर जप्त केले होते. जप्त केलेल्या 82 सायलेन्सर नष्ट करण्याची कारवाई शुक्रवारी करण्यात आली. रस्त्यावर हे सायलेन्सर ठेवून त्यावर बुलडोझरद्वारे ते नष्ट करण्यात आले. कोटसायलेन्सरमध्ये बेकायदा बदल करणार्या वाहनांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांना अशी वाहने आढळून आल्यास नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागाच्या हेल्प लाइनवर (7738 3938 39 )संपर्क साधावा.