पर्यावरणशीलतेला नवी मुंबईकरांची साद

15 हजारांपेक्षा अधिक बाप्पांचे; कृत्रिम तलावात विसर्जन

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

स्वच्छतेत सातत्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने व देशातही स्वच्छतेच्याबाबतीत सतत वरचा क्रमांक पटकवणार्‍या नवी मुंबईकरांनी यंदा गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणपुरकतेचे दर्शन घडवले आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील एकूण 37,452 गणेशमूर्तींपैकी तब्बल 15,075 गणेशमूर्तींचे कृत्रीम तलावांमध्ये विसर्जन करुन पर्यावरणाविषयीची जागृकता दाखवून दिली आहे. नवी मुंबईमहापालिका क्षेत्रात अनंत चतुर्दशीच्या दिवशी एकूण 9096 श्रीगणेशमूर्तींना गणपती बाप्पा मोरया च्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला .

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार अनंत चतुर्दशीला नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये एकुण 8608 घरगुती व 488 सार्वजनिक अशा एकूण 9096 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यामध्ये पारंपारिक 22 मुख्य विसर्जन स्थळांवर 4832 घरगुती तसेच 457 सार्वजनिक अशा 5279 श्रीमूर्तींचे तसेच मोठ्या संख्येने बनविण्यात आलेल्या 134 कृत्रिम विसर्जन तलावांना पसंती देत त्या ठिकाणी 3776 घरगुती व 41 सार्वजनिक अशा 3817 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच जल प्रदूषण रोखण्यासाठी आणि विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्रात सर्वाधिक 134 इतक्या मोठ्या संख्येने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळांवर गणेशभक्तांनी पालिकेच्या पर्यावरणपुरकतेला चांगला प्रतिसाद दिला आहे.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगिरे संपूर्ण विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मुख्य विसर्जनस्थळांवर व्यासपीठ उभारण्यात आले होते. तेथे ध्वनीक्षेपकाव्दारे श्रीगणेशभक्तांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना विसर्जनाच्या दृष्टीने मौलिक सूचना देण्यात येत होत्या. त्याठिकाणी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाकरिता तराफ्यांची व फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती.

सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळांच्या काठांवर बांबूचे बॅरॅकेटींग करण्यात आले होते. तसेच विद्युत व्यवस्थेसह अत्यावश्यक प्रसंगी जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आलेली होती. पिण्याचे पाणी व प्रथमोपचारासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी सर्व विसर्जनस्थळांवर 1 हजारहून अधिक स्वयंसेवक, अग्निशमन जवान, लाईफ गार्डस् दक्षतेने तैनात होते. शहरातील मुख्य 14 तलावांमध्ये गॅबियन वॉल पध्दतीच्या रचनेव्दारे निर्माण केलेल्या विशिष्ट जागेत भाविक भक्तांनी व मंडळांनी श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेस अनमोल सहकार्य केले.

नवी मुंबई महापालिकेने यावर्षी 134 कृत्रिम विसर्जन तलाव केले होते.नागरिकांनी कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये विसर्जन करण्यास पसंती दिली. स्वयंशिस्तीचे व पर्यावरणशीलतेचे दर्शन घडविले. त्याचप्रमाणे अनेक नागरिकांनी मंगलमय वातावरणात घरीच श्रध्दापूर्वक श्रीमूर्तींचे विसर्जनही केले

संजय देसाई ,शहर अभियंता
Exit mobile version