। उरण । घन:श्याम कडू ।
आजच्या काळात दुसऱ्याची वस्तू मिळाली की स्वतःकडे ठेवण्याची प्रवृत्ती वाढत चालली असताना, उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ नारायण ठाकूर यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्स इंडिया कंपनीसमोर तब्बल 17 तोळ्यांचा सोन्याचा गंठण आणि रोख रक्कम नवनाथ ठाकूर यांना सापडली. मात्र, या मौल्यवान वस्तूवर डोळा न ठेवता त्यांनी एक रुपयाचीही अपेक्षा न करता ती वस्तू राजू शांताराम पाटील उर्फ राजू टेलर यांच्या सौभाग्यवती रा. कोप्रोली यांना प्रामाणिकपणे परत केली. आजच्या स्वार्थी युगात एवढ्या मोठ्या किमतीची वस्तू परत करणे म्हणजे खरोखरच मोठे धाडस आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. नवनाथ ठाकूर यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. समाजात अजूनही सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा जिवंत आहे, हे नवनाथ ठाकूर यांच्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या या अभिमानास्पद कार्याबद्दल परिसरातून त्यांचे मनापासून अभिनंदन करण्यात येत असून त्यांनी असेच सामाजिक कार्य करत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवनाथ ठाकूर यांनी दाखवला प्रामाणिकपणाचा आदर्श
