पेणच्या मुर्तीशाळांमध्ये नवरात्रोत्सवाची धामधूम

विविध रुपातील देवींवर अखेरचा हात
| पेण | प्रतिनिधी |

गणेशोत्सवाची धामधूम संपली.पक्ष पंधरवडाही निम्मा सरल्याने पेणच्या मुर्तीशाळांमध्ये आता नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरु असल्याचे चित्र दिसत आहेत. दोन वर्षे कोरोनामुळे सारे सण,उत्सव साधेपणाने साजरे करावे लागले होते.पण यावर्षी संकट टळल्याने सरकारने सर्व सण निर्बंधमुक्त केले.त्याचे प्रत्यंतर नुकत्याच साजर्‍या झालेल्या गणेशोत्सवात दिसून आले.आता सर्वांनाच वेध लागलेत आठवडाभरांनी साजर्‍या होणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवाचे.

यंदाच्या नवरात्रोत्सवात देवींच्या मुर्तींमध्ये नाविण्य आणण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अनेक मूर्तीशाळांना भेट देऊन आपल्या आवडीच्या देवीच्या मूर्ती पसंत रु लागले आहेत. त्यामुळे येथील मूर्तीकार दुर्गा मातेच्या मूर्ती आकर्षक तयार होण्यासाठी काढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यातच गेल्या आठ ते दहा दिवसापासून जिल्हयात पावसाने घातलेला थैमान घातले आहे. पेण तालुक्यात झालेली ढगफुटी यासर्व बाबींचा विचार करता मुर्तीकारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असताना देखील मुर्तीकार पूर्ण ताकदनिशी आपल्या मूर्तीशाळामध्ये दुर्गा मातेच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्थ पहायला मिळतात. काही ठिकाणी लाकडाच्या शेगडयांच्या सहाय्याने मूर्ती सुकविल्या जात आहेत. तर काही ठिकाणी मुर्तींना पॉलिश करणे सुरू आहे, दुसरीकडे रंग काम, तर काही ठिकाणी रंगापेक्षा नव नविन वस्त्र लावण्यात कारागीर व कारखानदार व्यस्थ पहायला मिळतात.

पितृपक्ष संपताच सोमवार पासून नवरात्र उत्सवाला सुरूवात होत असून मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत महिलावर्ग देखील नवरात्री उत्सवाच्या तयारीसाठी लागलेले पहायला मिळतात. एकंदरीत मुर्तीकारांसह मंडळाचे सभासद, महिला वर्ग, दुर्गा मातेच्या आगमनासाठी जय्यत तयारीला लागले आहेत.

मुसळधार पावसामुळे मूर्ती सुकविण्यासाठी मोठा अडथळा येत आहे. त्यातच अचानक मुर्तींच्या उंचीमध्ये मंडळाच्या सभासदांनी केलेल्या वाढीमुळे अनंत चतुर्थीनंतर नव्याने मूर्ती तयार कराव्या लागल्या आहेत. त्या लाकडांच्या सहाय्याने सुकवाव्या लागत आहेत. त्यातच मंडळाच्या सभासदांकडून रंगापेक्षा खर्‍याखुर्‍या कपडे परिधान करून मूर्ती सजवून मागितल्या जात आहेत. मात्र,त्या ओल्या असल्याने ते करणे कठिण होत आहे. 15 ते 20 तास काम करून देखील आलेल्या ऑर्डर पूणर्र् होतील की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.

– अजित लांगी, गावदेवी कला केंद्र, अंतोरा


Exit mobile version