| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा शहरासह तालुक्यात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, विविध नवरात्रोत्सव मंडळांच्यावतीने धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या आराधनेबरोबरच महिलांना, लहान मुलांना आणि युवकांना सहभागी करून घेणाऱ्या विविध उपक्रमांमुळे शहरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
म्हसळा शहरातील श्रीराम नवरात्र उत्सव मंडळ, कुंभार समाज नवरात्र उत्सव मंडळ, आदिवासी वाडी नवरात्र मंडळ आणि बेलदार समाज मंडळ यांच्यावतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. या मंडळांनी उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान महिलांच्या भजनाचे आयोजन करण्यात येत असून, पारंपरिक भोंडला नृत्याच्या माध्यमातून महिलांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याची संधी मिळत आहे. लहान मुलांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आले आहेत, त्यांच्या सहभागामुळे उत्सवात आनंदाची भर पडणार आहे.
तसेच, दररोज होणारी देवीची महाआरती हे उत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे. याशिवाय भाविकांसाठी लकी ड्रॉ, धार्मिक विधी म्हणून होम तसेच रात्रीच्या वेळी रंगणारा गरबा यामुळे नवरात्रोत्सवाला विशेष रंगत येणार आहे. या उत्सवातून नऊ दिवस धार्मिक श्रद्धा, पारंपरिक लोककला आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. महिला, युवक, बालके आणि नागरिकांचा सहभाग जास्त प्रमाणात वाढत असून, नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि बंधुभाव जपण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जात आहे.
म्हसळ्यात नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात
