जिल्ह्यात साडेचार हजार ठिकाणी घटस्थापना

नऊ दिवस रंगणार गरबा रास; भजनांसह विविध उपक्रम

| अलिबाग | प्रतिनिधी |

गणरायाच्या विसर्जनानंतर दुर्गादेवीच्या आगमनाची लगबग गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर ही उत्कंठा संपली आहे. रविवारी जिल्ह्यात 4 हजार 662 ठिकाणी घटस्थापना करण्यात आली. त्यात एक हजार 328 ठिकाणी दुर्गी देवी, तीन हजार 148 ठिकाणी घट व 186 ठिकाणी छायाचित्रांची स्थापना करण्यात आली. वाजत गाजत देवीचे स्वागत करण्यात आले असून नऊ दिवस दसऱ्यापर्यंत गरबा रास, भजनांच्या कार्यक्रमांसह विविध कार्यक्रम होणार आहे. दुर्गादेवीची घटस्थापना करण्यासाठी सार्वजनिक मंडळासह खाजगी मंडळाकडूनही जोरदार तयारी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आली. 15 ऑक्टोबर रोजी देवीचेआगमन झाले. दुर्गादेवीची मूर्ती मिरवणुकीने वाजतगाजत आणण्यात आली.

जिल्ह्यामध्ये एक हजार 327 ठिकाणी देवीच्या मुर्तीची तर नेरळमध्ये देवीच्या छायाचित्राची मिरवणूक काढत देवीचे स्वागत करण्यात आले. पारंपारिक पेहराव करीत विधीवत पुजा करीत देवीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर देवीला लागणारे नैवेद देण्यात आले. त्यानंतर आरती पुजा करण्यात आली. त्यानंतर ठिकठिकाणी भजन ठेवण्यात आले. या भजनांमूळे जिल्ह्यात मंगलमय वातावरण निर्माण झाले. अबालवृध्दांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन देवीच्या स्वागताचा आनंद लुटला. 24 ऑक्टोबरपर्यंत भजनांसह सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. भजनांच्या स्पर्धादेखील ठेवल्या जाणार आहेत. बाल्या नृत्यांचे सादरीकरणदेखील या नऊ दिवसांच्या कालावधीत होणार आहे. त्यामुळे नऊ दिवस, नऊ रात्र जागरण करून देवीची मनभावे पुजा केली जाणार आहे. नवरात्रौत्सव साजरा करीत असताना कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी रायगड पोलीसदेखील सज्ज झाले आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कडक पहारा ठेवला जाणार आहे. त्याची तयारी जोरात केली असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.

Exit mobile version