छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

पूना नर्कोम मोहिमेअंतर्गत 43 जणांचे समर्पण
बक्षीस असणार्‍या नक्षलवाद्यांचाही समावेश

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

छत्तीसगड राज्यातील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पूना नर्कोम मोहिमेअंतर्गत नऊ महिला नक्षलवाद्यांसह एकूण 43 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
सुकमा शहरातील वरिष्ठ पोलीस आणि सीआरपीएफ अधिकार्‍यांसमोर जिल्ह्यातील दहा गावांतील 43 नक्षलवादी हजर झाले आणि आत्मसमर्पण केल्याची माहिती सुकमाचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी पीटीआयला दिली आहे. जिल्ह्यात सुरक्षा दल आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने नक्षलनिर्मूलन मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत पोलीस दल सुकमाच्या अंतर्गत मोहिमेपर्यंत पोहोचून जिल्हा प्रशासनाच्या पुनर्वसन धोरणाला प्रोत्साहन देत आहे. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून द्यावा, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

आत्मसमर्पण केलेला एक नक्षलवादी पोडियामी लक्ष्मणवर छत्तीसगड सरकारने 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सुकमाचे एसपी सुनील शर्मा म्हणाले की, शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांनी शासन आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे वचन घेतले आहे. सध्या सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे. तर पुनर्वसन धोरणांतर्गत प्रत्येकाला इतर सुविधा दिल्या जातील.
दरम्यान, सुकमाचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसोबत बसून जेवण केले. यावेळी सीआरपीएफचे अधिकारीही उपस्थित होते. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पूना नर्कोम मोहिमेच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील सुमारे 25 ते 30 गावांमधून एकूण 176 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती सुकमाचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी दिली आहे.

Exit mobile version