नयन आंबटकर यांची पोलीस अधीक्षकांकडे न्यायासाठी साकडे

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील बॅटरी चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास मुरुड पोलीस टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप नयन आंबटकर यांनी केला आहे. चोरट्यांना अभय दिले जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांंनी अखेर पोलीस अधीक्षकांना साकडे घातले आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.

मुरुडमधील राजपुरी कोळीवाडा परिसर कायमच गजबजलेला असतो. येथील नागरिक मासेमारी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी 22 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विजयसागर नावाच्या यंत्रचलित बोटीतून बॅटऱ्या, तांबा, पितळ लोखंड आदी साहित्यांची काहींनी चोरी केली. एका टेम्पोत भरून ते साहित्य भंगार व्यवसायिकाला दिल्याचे नयन आंबटकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मुरुड पोलीसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी येऊन टेम्पो ताब्यात घेतले. मात्र चोरी करणाऱ्या चौघांविरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांचे अभय मिळत आहे. त्यामुळे ते आजही मोकाटपणे फिरत असल्याचे आंबटकर यांचे म्हणणे आहे.

नयन आंबटकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, चोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. माझ्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरी करणाऱ्यांपैकी एकाने मला ठार मारून बोट जाळण्याची धमकी दिली. याबाबत तक्रार देऊनही ठोस कारवाई केली नाही. मुरुडचे पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्याकडून तक्रारदाराला न्याय मिळत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे साकडे घातले आहे.

राजपुरी प्रकरणाबाबत टेम्पो ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. ज्यांची नावे सांगितली, त्यांना चौकशीसाठी बोलावले. परंतु त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. संशयितांविरोधात चोरी केल्याचे पुरावे असल्यास देण्याबाबत आंबटकर यांना सांगितले आहे. मात्र अजूनपर्यंत कोणतेही पुरावे दिले नाहीत. त्यामुळे चोरीचा गुन्हा दाखल करू शकलेे नाही.

निशा जाधव- पोलीस निरीक्षक, मुरुड
Exit mobile version