महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा; डेपोतील रांगा आणि रिचार्जची धावपळ होणार कमी
| मुंबई | प्रतिनिधी |
एसटी महामंडळाने महिला आणि 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्डचे वाहकांमार्फतच ‘टॉपअप’ करण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे कार्डमध्ये बॅलन्स नसल्यास रिचार्जसाठी डेपो अथवा केंद्रावर जाण्याची प्रवाशांची धावपळ कमी होणार आहे.
एक सप्टेंबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, बॅलन्सअभावी अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता बसमध्येच आवश्यक रक्कम कार्डमध्ये भरता येणार असल्याने सवलतीचा लाभ घेणे सोपे होणार आहे. तसेच ‘भीम’ ॲपद्वारेही कार्डच्या मागील बाजूस असलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून टॉपअप करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात या सुविधेमुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्यासोबतच महामंडळाच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
